Thursday, May 9, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकश्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त देशभरातील लाखो भाविकांनी घेतले समाधी दर्शन..!

श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त देशभरातील लाखो भाविकांनी घेतले समाधी दर्शन..!

Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे,पाथर्डी:
श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागासह शेजारील राज्यातील मिळून सुमारे पाच लाख भाविकांनी संजीवन समाधी व कलश दर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण तालुक्याला यावेळी यात्रेचे रूप आलेले पहावयास मिळाले. नगरपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. मोहटादेवी, वृद्धेश्वर व मायंबा येथेही भाविकांची गर्दी होऊन पाथर्डी शहरातील सर्व प्रमुख रस्ते भाविकांच्या तुडूंब गर्दीने फुलून गेले होते. मढी पंचक्रोशीत विशिष्ट डफांचा आवाज व नाथांचा जयजयकार घुमत होता. चैतन्य कानिफनाथांची यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालते. रंगपंचमी हा यात्रेचा दुसरा व प्रमुख टप्पा आहे. चतुर्थीच्या दुपारनंतर भाविकांची संख्या वाढून पंचमीला बहुसंख्य भावी नाथषष्ठीसाठी पैठणला जातात. फुलोर बाग यात्रा नावाचा तिसरा व शेवटचा टप्पा अमावस्येला संपन्न होईल. रंगपंचमी हा दिवस नाथांचा संजीवन समाधी दिन म्हणून या दिवसाचे मोठे महत्त्व नाथ संप्रदायकांमध्ये आहे. पुणे, मुंबई, कल्याण, नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, धुळे, बीड परभणी, नांदेड, सातारा अशा सर्वच विभागातून मोठ्या प्रमाणात भाविक आले. गुजरात, तेलंगण राज्यातील भाविक यावेळी मुक्कामी न थांबता दर्शन घेऊन माघारी फिरले. भाविकांची वाढती गर्दी व स्थानिक रेवड्यांची प्रसिद्धी याचा गैरफायदा उठवत बहुतेक विक्रेत्यांनी अचानक भाव वाढ करून माल विकल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत केवळ प्रसाद म्हणून रेवड्या खरेदी केल्या. सर्व भाविकांनी मिळून सुमारे पन्नास हजार देवकाठ्या वाजत गाजत नाथांच्या भेटीसाठी आणल्या. हा सोहळा खूपच प्रेक्षणीय असतो. नाथांच्या समाधी भेटीसाठी ज्या बाजूने गडावर जाण्यासाठी रस्ता होता, तेथे प्रचंड गर्दी व वाद्यांच्या तालावर बेधुंद होत नाचत नाचत गड चढणारी भाविक असूनही एकही अनुचित प्रकार घडला नाही. पुणे जिल्ह्यातील भाविकांचे वाद्यकाम व योगदान यावेळी खूपच प्रेक्षणीय असते. पुणे, नाशिक जिल्ह्यातील डफ वाजवणाऱ्यांच्या मंडळांनी सर्वच भाविकांचे लक्ष वेधून घेतले. पालख्यांच्या व अस्तण्यांच्या दर्शनासाठी झालेली गर्दी संपूर्ण परिसरात टिकून राहिली. यात्रेनिमित्त शेती साठी लागणारे साहित्य ,औषधी वनस्पती, पूजा साहित्य, मोरपीस, नाथ संप्रदायाचे पूजा साहित्य, स्टेशनरी कटलरी व्यवसाय व हलवाई व्यवसाय याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. आज एकाच दिवशी सर्व मिळून सुमारे 15 कोटींची ऊलाढाल होऊन सर्वाधिक ग्राहक रेवडी विक्रेत्यांनी खेचले. एसटी महामंडळाची सेवा सुद्धा यावेळी समाधानकारक राहिली मात्र भाविकांच्या गर्दीपुढे पैठणला जाण्यासाठी दुपारनंतर गाड्यांची संख्या कमी पडली. ठिकठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये बसेस अडकून पडल्या. दरवर्षी डुक्कर व मुंगूस यांच्या केसांचा व्यापार सकाळी तासाभरात पार पडत होता. यावर्षी मात्र असे व्यापारी यात्रेकडे फिरकले नाहीत. सापाची तस्करी करून सौंदर्यप्रसाधनांसाठी उपयोगात येणारी सापाची कातडी सुद्धा कुठे बघायला मिळाली नाही. तीव्र उन्हाळा व दुष्काळामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊन शंभर रुपयांना पिण्यासाठी बादलीभर पाणी तर दोन हजार रुपयांना पाण्याचे टँकर विकले गेले. काही विक्रेत्यांनी पहाटे आंघोळीला बादलीभर गरम पाण्यासाठी सुद्धा 80 रुपये वसूल केले. भाविकांच्या गर्दीमुळे टँकर गावात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. हॉटेल चालकांनी सुद्धा भाविकांना पाणी पिऊ दिले नाही.

तालुका प्रशासनाने टँकर पुरवठ्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसले नाही. एक पाण्याची बाटली वीस रुपयांना विकली जाऊन त्यामध्ये अंघोळी सारखे गरम पाण्यावर भाविकांना तहान भागवावी लागत होती.वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी उपसा वितरण थांबले काही काळ थांबले होते. आणि बाटलीबंद पाणी थंड करणारी दुकानातील यंत्रणा सुद्धा बंद असल्याने लोकांना गरम पाणी पिऊन तहान भागवावी लागली. पनवेलच्या भाविकांनी दर्शन रांगेत भाविकांना पाणी दिले तर देवस्थान समितीने गडावरील मोठा हौद भरून ठेवल्याने गडावर फारशी टंचाई जाणवली नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांनी सांगितले. यावर्षी देवाच्या नावावर पशुहत्या अजिबात झाली नाही. बोकड अथवा कोंबड्यांचा बळी देण्याचा प्रकार पूर्णपणे रोखण्यात देवस्थान समिती व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना यश आले. भटक्यांची पंढरी समजली जाणारी यात्रा प्रशासनाची सत्वपरीक्षा पाहणारी ठरून दुपारनंतर मढी , पाथर्डी, शेवगाव, मोहटा रस्ता, नगर रस्ता, पूर्णपणे वाहतूक कोंडीत हरवून तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तिसगाव येथे तर वाहतूक कोंडी दिवसभर होती. मायंबा, मढी असा दहा किलोमीटरचा रस्ता व घाट वाहतूक कोंडीत हरवून गेल्याचे दिसले.

वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा पोलिसांचे नियंत्रण अपुरे पडले. त्यातच रस्त्यावरच ठाण मांडून माल विकणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. अगदी राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा पाथर्डीत विविध प्रकारच्या हातगाड्या व पथारी वाल्यांनी वाहतूक कोंडीत भर घातली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र यात्रा परिसरात गुन्हेगारांची संख्या घटली. पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व सर्व अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांची जागेवरच नाकेबंदी करत गडासह यात्रा परिसरात काही किरकोळ अपवाद वगळता चोऱ्या झाल्या नसल्याचे चित्र दिसत होते. आज सायंकाळनंतर पोलिसांच्या पथकाकडून सीसीटीव्हीचे परीक्षण सुरू होणार आहे. यामध्ये सर्व काही प्रकार लक्षात येतील. यात्रा नियोजन समितीने पोलिसांच्या सांघिक कामगिरीचे कौतुक केले. नगर, पाथर्डी, शेवगाव, पैठण, बीड, आष्टी असे सर्वच रस्ते वाहतूक कोंडीत अडकून सुमारे ४० किलोमीटरचा परिसर ट्राफिक जाम मध्ये राहिला. वाहतूक कोंडीचे प्रमुख केंद्र तिसगाव व पाथर्डी शहर राहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments