Monday, May 20, 2024
HomeUncategorizedशिरूरमधून चोरी गेलेली दुचाकी कर्जत पोलिसांकडून जप्त

शिरूरमधून चोरी गेलेली दुचाकी कर्जत पोलिसांकडून जप्त


👉सराईत आरोपीस अटक
नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
कर्जत –
अनेकवेळा आपल्याला पोलिसांच्या डोक्यात काय चाललंय याचा जरासाही अंत लागत नाही. एखाद्या गुन्ह्याचा तपास असो किंवा त्यांनी सुरू केलेली पेट्रोलिंग असो, हे करत असताना अनेक तर्क-वितर्क त्यांच्या विचारात असतात आणि त्यात जर एखादी बाब कायद्याला धरून नसेल तर त्याची उलट तपासणी झालीच म्हणून समजा. असाच काहीसा प्रकार पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही आणि त्यांनी बांधलेल्या संशयावरून एका चोरीच्या दुचाकीचा शोध लागला आहे.
त्याचे झाले असे, राशीन येथील आठवडे बाजार असल्याने दि.१७ रोजी दुपारी एकच्या सुमारास राशीन दुरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी स. फौ. तुळशीदास सातपुते,पो.हे.कॉ.आण्णासाहेब चव्हाण,पो.कॉ.शिंदे,पो.कॉ.पोकळे हे कुठे गडबड गोंधळ होऊ नये, चोरीसारखे प्रकार घडू नयेत म्हणुन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आदेशा नुसार राशीन गावात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी राशीन येथील करमाळा चौकात एक इसम हिरो होंडा स्प्लेंडर या दुचाकीवर बसला होता मात्र त्या दुचाकीच्या पुढे आणि मागे एकही आरटीओ नंबरप्लेट नसल्याने पोलिसांच्या डोक्यात संशयाची पाल चुकचुकली. गाडीवरील चालत ही संशयित वाटला, त्यांनी सदर इसमास आपल्या ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने गणेश मंगेश काळे वय-२० (रा.कुळधरण ता.कर्जत) असे नाव सांगितले. सदर इसमावर यापूर्वीचे चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याबाबत लक्षात आल्याने संशय आणखी बळावला. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेली दुचाकी कोणाची आहे? तिचा नंबर काय आहे? अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.गाडीच्या मालकीबाबत त्याला कसलेच उत्तर देता आले नाही.त्यानंतर हेड कॉन्स्टेबल आण्णासाहेब चव्हाण यांनी दोन लायक पंचांना बोलावून संबंधित दुचाकीचा पंचनामा केला त्यानंतर दुचाकीसह त्या इसमाला कर्जत पोलीस ठाण्यात आणले.संबंधित इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास केला असता संबंधित इसमाकडे आढळून आलेली दुचाकी (शिरूर जि. पुणे) येथून चोरीस गेली असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस हवालदार अण्णासाहेब चव्हाण, मारुती काळे, भाऊ काळे, संपत शिंदे, देविदास पळसे आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments